मुंबई : गुरुवारी (३० ऑक्टोबर) मुंबईतील पवई परिसरात एका अत्यंत धक्कादायक 'ओलीसनाट्या'चा थरार बघायला मिळाला. पवई येथील आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने १७ लहान मुलांना ओलीस (बंधक) ठेवले होते. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. पण पोलिसांनी सतर्कता दाखवत रोहित आर्याचं एन्काऊंटर करत १७ मुलांची सुटका केली. या एन्काऊंटरच्या घटनेला आता जवळपास २४ तास पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप त्याच्या कुटुंबाचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये.
रोहित आर्याचं कुटुंब मिसिंग असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. रोहित आर्याचे आई वडील पुण्यात ज्याठिकाणी राहत होते, तिथे घराला कुलूप लावण्यात आलं आहे. शिवाय त्याच्या मुंबईतील घरीही कुणी नाहीये. रोहित आर्याच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याने शवविच्छेदन देखील रखडलं आहे. यामुळे आता पोलीस कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
मृतदेहावर अजूनही शवविच्छेदन नाही
रोहित आर्या एन्काऊंटरमध्ये ठार होऊन चोवीस तासांहून अधिक काळ उलटला असला तरी, त्याच्या मृतदेहावर अजूनही शवविच्छेदन (Post-mortem) झालेले नाही. आज सकाळी दहा वाजता सहा तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रोहित आर्याचे शवविच्छेदन होणार होते. मात्र, आर्याचे कोणतेही नातेवाईक शवविच्छेदनासाठी आले नसल्याने तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. पोलीस त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
नातेवाईक न आल्यास कोर्टाचा आदेश
रोहित आर्याचे कुटुंब कुठे आहे आणि त्यांच्याशी संपर्क का होत नाही, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. जर त्याचे नातेवाईक आज शवविच्छेदनासाठी आले नाहीत, तर वरिष्ठ डॉक्टरांच्या माहितीनुसार, आज शवविच्छेदन होण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा परिस्थितीत, पोलीस न्यायालयात धाव घेऊ शकतात. त्यामुळे शवविच्छेदनासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
नेमकं काय घडलं?
रोहित आर्या याने लघुपटाच्या (शॉर्ट फिल्म) ऑडिशनच्या नावाखाली अनेक जणांना स्टुडिओमध्ये बोलावले होते. त्यानंतर त्याने यातील १७ मुलांना एका बंद खोलीत डांबून त्यांना ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने स्टुडिओ परिसरात धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. रोहित आर्या याच्याकडे एअरगन होती आणि तो मुलांच्या जीवितास धोका निर्माण करू शकला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे, गुरुवारी दुपारी पोलिसांनी कारवाई करत रोहित आर्या याचा एन्काऊंटर केलं.